विज्ञानवादी हाफकिनमध्ये " रात्रीस खेळ चाले", अंधश्रद्धेला बळी न पडणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याची गरज!
मुंबई, नीता परब: वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि जनआरोग्याच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हाफकिन महामंडळात सध्या अंधश्रद्धा, संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र दिनी उलटा राष्ट्रध्वज फडकावल्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले हाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर आता आणखी एका विचित्र प्रकारामुळे चर्चेत आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने मंगळवारी, १९ मे २०२६ रोजी महिंद्रकर यांच्या बदलीचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास, ते राहत असलेल्या हाफकिन वसाहतीतील ‘राजयोग’ निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तीने लिंबू, टाचण्या आणि कुंकू ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीत आला. ही घटना घडली त्यावेळी घरी केवळ त्यांचा मुलगा हजर होता. हा प्रकार पाहून तो घाबरला आणि त्याने तत्काळ सुरक्षा रक्षकांसह इतरांना बोलावले. काही वेळातच महिंद्रकर यांच्या घराबाहेर ४० ते ५० जणांची गर्दी जमली. कुटुंबासोबत फिरण्यासाठी मुंबई बाहेर असलेल्या महिंद्रकर यांना सदर घटना कळताच, त्यांनी आपल्या मुलाला भोईवाडा पोलिस ठाणे गाठण्यास सांगत, प्रशासन अधिकाऱ्यांना देखील भाईवाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मात्र, दुसरीकडे भोईवाडा पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने न घेता ते साहित्य उचलून थेट कचऱ्यात फेकल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
“हाफकिनसारख्या विज्ञानवादी संस्थेत अंधश्रद्धेला घाबरून पोलिसांना बोलावलं?” असा सवाल करत पोलिसांनी हसत- हसत घटनास्थळावरून निघून जाणे पसंत केल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीच त्यांच्या निवासस्थानाबाहेर महामंडळाच्या खर्चातून सीसीटिव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर रजा संपल्यानंतर २८ मे रोजी पुन्हा हाफकिनमध्ये रुजू होणार असून, घराबाहेर लिंबू ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी प्रशासन विभागाला सांगितल्याचे समजते.
‘लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता…’; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी
एकीकडे विज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक विचारांचा पुरस्कार करणारी संस्था, आणि दुसरीकडे अंधश्रद्धेच्या भीतीने हादरलेले वरिष्ठ अधिकारी या विरोधाभासामुळे हाफकिन महामंडळाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आता हाफकिनला खऱ्या अर्थाने विज्ञानवादी, तर्कशुद्ध आणि अंधश्रद्धेला थारा न देणाऱ्या आयए एस अधिकाऱ्याची गरज असल्याची भावना कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. सपूर्ण प्रकाराबाबत हाफकिन महामंडळ संचालक सुनील महिंद्रकर यांच्याबरोबर संपर्क साधला असता , ते मुंबई बाहेर असल्या कारणास्तव संपर्क होऊ शकला नाही.






