Photo Credit : Team Navrashtra
मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व परावे सीबीआयकडे असल्याचे वाझेने म्हटले आहे. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करण्यासही तयार असल्याचे सचिन वाझे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातच हे सर्व पुन्हा बाहेर का काढले गेले. विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्या असतानाच हे सर्व आताच का समोर आले. गेले दहा वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता असतानाही या गोष्टी आताच कशा येतात. गेले अडिच वर्षांपासून यांचे महाराष्ट्रात सरकार आहे. पण बरोबर विधानसभा निवडणुकीच्या आधीच ही पत्रे, हे आरोप प्रत्यारोप कसे येतात.
अनिल देशमुखांविरोधात न्यायालयात जी केस चालू आहे त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. सर्व खोटे ठरले आहे. त्यामुळे 100 कोटीचा हिशोब कुठेच नाहीये. बाकीच्या लोकांची नावे घेणे म्हणजे हे तर खूपच बालीशपणा आहे. जेव्हा ती केस झाली, एफआयआर झाला, त्यात 100 कोटीतल्या 1 चा पण उल्लेख नाही आणि शुन्याचाही उल्लेख नाही. म्हणजे 100 कोटींचा आरोप खोटा ठरला ना. ज्यांनी आरोप केले ते आज कुठे आहेत. पत्र कोणी, कधी लिहीले, हाही प्रश्न आहेच, मीही उद्या पत्र लिहून आरोप करेल. की देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे 10 हजार कोटी मागितल. असे नसते, आयुष्य खूप गंभीर असते आम्ही असे आरोप कधी केले का, आम्ही पातळीसोडून कधीही बोलत नाही. खोटे आरोप करत नाही. जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा त्याच्यासोबत उभे राहायला ताकद लागते आणि ते यांच्यातील कुणाच्यातही नाही.
खासदार, संजय राऊत, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ या सर्व नेत्यांना भाजपने किती त्रास दिला, ते मी पाहिले. पण आज महाराष्ट्राचे राजकारण खूप गलिच्छ झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेर काढण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हे पत्र आणि नाव त्यांनी का घेतले, असाही सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.