सुशीलकुमार शिंदेकडून 'स्वातंत्र्यवीरां'चे कौतुक (फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई: काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असलेली भूमिका सर्व देश जाणून आहे. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीरांबद्दल आक्षेपार्ह विधाने करत असल्याचे पाहायला मिळते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अनेक जण कोर्टात देखील गेले आहेत. मात्र आता कॉँग्रेसची या विषयावरून कोंडी होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करण्यात आले आहे. आता या गोष्टीमुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे.
सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. दरम्यान त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्वातंत्र्यवीरांचे कौतुक करण्यात आले आहे. सावकरकरांनी अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते. कॉँग्रेसला विचारसरणी सुधरण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचारित्रामध्ये मांडले आहे.
“माझ्या मनामध्ये सावरकरांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे १९८३ मध्ये नागपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद संपुष्टात आणण्यासाठी सावरकरांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वता: मागासवर्गीय असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्व वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा निघाला की, त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसारणीवर इतका का भर दिला जातो याचे मला आश्चर्य वाटते. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. खूप काळ राजकारणात काम केल्यानंतर मला अस वाटत की, कॉँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे”, असे सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
दरम्यान ‘फाइव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स’ या सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचारित्राचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. मात्र यातील सावरकरांच्या कौतुकामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची वाटचाल कशी असली पाहिजे याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी परखड मत मांडले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची आणि राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दलची भूमिका ही सर्वश्रुत आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी होऊ शकते. भाजप हा मुद्दा धरून काँग्रेसवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.