सोलापूर – लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असल्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठी आणि सभांचे सत्र वाढले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे देखील सोलापूरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सुशीलकुमार शिंदे यांनी कोळी समाजाच्या पाठिंब्यासाठी बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांना सत्तेची चटक लागलेली असल्याचा गंभीर आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांना सत्तेची चटक
कोळी समाजासोबत संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना आता सत्तेची चटक लागलेली आहे. त्यासाठी ते स्वतःला हवे तसे निर्णय घेत आहेत. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी सारखे निर्णय देशावर लादून हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवली आहे. अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या निर्णयावर टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हुकूमशाही आली की मी मला बोलता येणार नाही
पुढे सुशीलकुमार शिंदे यांनी मी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत राहणार आहे. 2024 ची ही लोकसभा निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. देशामध्ये एकदा का हुकूमशाही आली की मी मला बोलता येणार नाही. जर बोललोच तर जेलमध्ये जावं लागेल. असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर प्रणिती शिंदे या खासदार म्हणून संसदेमध्ये निवडून गेल्यानंतर शरद कोळी यांना जोरजोरात बोलण्याची गरज पडणार नाही. त्या कोळी समाजाचे प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.