File Photo : Employee
नागपूर : महापालिकेतील कर्मचारी कधी कामावर हजर असतात तर कधी गैरहजर दिसून येतात. पण अशीच गैरहजेरी नागपूर महानगरपालिकेतील 39 कर्मचाऱ्यांना भोवली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अचानक दौरा केला. या दौऱ्यादरम्यान अनेक प्रभागातील स्वच्छता कर्मचारी गायब दिसून आले. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा पडल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दुर्दशा बघता विनापरवानगी गैरहजर असलेल्यांवर निलंबनाच्या कारवाईचे निर्देश दिले.
हेदेखील वाचा : Google One Lite: आता अतिरिक्त डेटा डिलिट करण्याची गरज नाही गुगल फ्रीमध्ये देत आहे 15GB स्टोरेज
घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या ‘सरप्राईज व्हिजिट’मध्ये विना परवानगी गैरहजर आढळलेल्या अधिकाऱ्यांसह 39 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. ऐन गणेशोत्सवात शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. कर्मचारी विना परवानगीने गैरहजर राहात असल्याची बाब यावेळी पुढे आली. स्वच्छता कार्यात हयगय करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी आयुक्तांनी कठोर पाऊले उचलली आहे.
दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीमध्ये एका वरिष्ठ आरोग्य निरीक्षकासह तीन मलवाहक जमादार, एक प्रभारी जमादार व 34 सफाई कामगार विना परवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांवर आयुक्तांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश
निलंबितांमध्ये एका पक्षाची नेतेगीरी करणाऱ्याचाही समावेश आहे. निलंबितांमध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धर्मेश सिरसवान, मलवाहक जमादार राहुल रामटेके, स्वच्छता जमादार अतुल सिरकीया, स्वप्नील मोटघरे, प्रभारी स्वच्छता जमादार ओमप्रकाश हाथीपछेल, स्थायी सफाई कामगार शरद गजभिये यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – iPhone 16 lineup launched: नवीन सिरीज लाँच करताच ॲपलने बंद केले iPhone 15 Pro आणि iPhone 13