नागपुरात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; तब्बल 20 घरांवर चालवला बुलडोजर (संग्रहित फोटो)
नागपूर : जुना भंडारा रस्ता रुंदीकरणाची दोन दिवसांपासून सुरू असलेली कारवाई बुधवारीही सुरूच होती. जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाच्या आदेशानंतर अतिक्रमणविरोधी विभागाने सुमारे २० घरांवर बुलडोजर चालवला. याशिवाय विभागाने शहराच्या विविध भागांत अवैध अतिक्रमणे आणि ताब्याविरोधात मोठी कारवाई केली. यावेळी सतरंजीपुरा, धरमपेठ, लक्ष्मीनगर आणि गांधीबागसारख्या प्रमुख भागांतील रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त केले.
सतरंजीपुरा झोनमधील जुना भंडारा रस्ता रुंदीकरणासाठी मेयो हॉस्पिटल चौक ते जुना मोटार स्टँड आणि सुनील हॉटेलपर्यंतचे बेकायदेशीर बांधकामे पाडले. या मोहिमेंतर्गत १८ मीटर आणि ३० मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील रस्त्यांना अडथळा आणणारी अनधिकृत बांधकामे पाडली. या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त हरीश राऊत आणि नगररचना विभागाचे गावंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बर्डी-आयटी पार्कमधील फुटपाथ मोकळे धरमपेठ झोनमध्ये सीताबर्डी मेन रोड आणि व्हेरायटी चौक दरम्यान दिवसभर कारवाई सुरू राहिली. जिथे फुटपाथवरून अवैध वाहने व दुकाने हटविली. त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोनमध्ये आयटी पार्क, व्हीएनआयटी कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड आणि खामला मटन मार्केट परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली अवैध अतिक्रमणे हटवली.
अवैध ठेल्यांवर कारवाई
गांधीबाग झोनमध्ये अतिक्रमण विभागाने महाल चौक ते बडकस चौकापर्यंत देखील कारवाई केली. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी विभागाचे अधीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फुटपाथवरून अवैध ठेले हटवले.
याचिकाकर्त्यांविरोधात कारवाई नाही
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुना भंडारा रोडवरील काही मालमत्ता मालकांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी उच्च न्यायालयाने यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. बुधवारच्या कारवाईदरम्यान २० मालमत्तांवर कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या याचिकेतील याचिकाकर्त्यांच्या मालमत्तांवर कुठलीही कारवाई केली नाही.
हेदेखील वाचा : Pune Crime: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या, सहा आरोपी निष्पन्न; पुण्यातील घटना






