पुण्यात तापमानात आणखी घट; किमान तापमान 12.7 अंश सेल्सिअसवर (File Photo : Temperature)
पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या तापमानात आणखी घट झाली आहे. तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर गेले असून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील चार दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी (दि. १४) शहरात किमान तापमान हे १२.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
तापमानातील या घटीमुळे शहरात गारवा वाढला असून, पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. रस्त्यांवर नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर अशा उबदार कपड्यांमध्ये वावरताना दिसत आहेत. दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव कायम राहते.
हेदेखील वाचा : नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी घसरण होण्याचा इशारा दिला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस किमान तापमान सुमारे १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात आणखी घट होऊ शकते. कमाल तापमानातही किंचित कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे पुण्यातील थंडी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली.
तापमान घटल्याने आरोग्यावर दुष्परिणाम
तापमान घटल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी तज्ञांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. उबदार कपडे वापरणे, सकाळच्या थंड हवेत अनावश्यक बाहेर पडणे टाळणे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून, पुणेकरांनी सज्ज राहण्याची गरज आहे.






