बारामती: इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फ्लेक्स एका माथेफिरू व्यक्तिने जाळण्याचा प्रयत्न केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या माथेफिरू व्यक्तीला बेदम चोप देऊन तरुणांनी पोलीस दुरुक्षेत्रामध्ये आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेची तात्काळ दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन संतप्त जमावाला शांत करून संबंधित इसमावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान बारामती इंदापूर या पालखी महामार्गावर संतप्त जमावाने रास्ता रोको करून या घटनेचा निषेध करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी केलेल्या आवाहनानंतर दहा मिनिटात रास्ता रोको उरकण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदराज थोरात, सणसर ग्रामपंचायतचे माजी सदस्य मोहन सुरडकर, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे विक्रम निंबाळकर, सावता परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी जमावाला शांत करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान संतप्त जमावाने भवानीनगर बंदची हाक दिली होती, मात्र रमजान ईद चा दिवस असल्याने व्यवसायिकांना याचा फटका बसेल, त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी बंद पुकारू नये ,असे आवाहन करण्यात आले आहे.