पुणे प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजप उमेदवार ऐश्वर्या सम्राट थोरात जोरदार प्रचार सुरु आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Pune Political News : पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच प्रभाग क्रमांक २६ (घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समता भूमी) मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या सम्राट थोरात यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या प्रभागात जोरदार प्रचार दौरा केला. यावेळी विविध सोसायट्या, वाडे आणि वस्त्यांमधील नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामांच्या जोरावर विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
घरोघरी संवाद आणि नागरिकांचा प्रतिसाद
या प्रचार दौऱ्यात ऐश्वर्या थोरात यांच्यासह भाजपचे अनुभवी उमेदवार अजय खेडेकर, विष्णू हरिहर आणि स्नेहा माळवदे सहभागी झाले होते. उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर नागरिकांशी चर्चा केली. यावेळी नागरिकांनी स्पष्टपणे नमूद केले की, गेल्या काही वर्षांत प्रभागात झालेली विकासकामे आणि लोकप्रतिनिधींचा लोकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क हीच भाजपची जमेची बाजू आहे. विशेषतः सोसायट्यांमधील बैठकांदरम्यान पाण्याची समस्या, सुरक्षितता आणि आरोग्याच्या सुविधांवर नागरिकांनी आपली मते मांडली.
हे देखील वाचा : शिंदेंची नाराजी की फडणवीसांची खेळी; गणेश नाईकांना प्रभारी पदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय ?
युवा नेतृत्वाचा नवा जोम
भाजपने यंदा अनेक उच्चशिक्षित आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे, त्यापैकीच एक म्हणजे ऐश्वर्या सम्राट थोरात. आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझे पती सम्राट थोरात यांनी या भागात कामाचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही केवळ आश्वासनं देत नाही, तर ‘काम करत आलोय आणि काम करत राहणार’ हा आमचा ब्रीद आहे.”

प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा जोरदार प्रचार सुरु आहे (फोटो – टीम नवराष्ट्र)
विकासाचा ‘रोडमॅप’
ऐश्वर्या थोरात यांनी प्रभागासाठी आपले व्हिजन स्पष्ट करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले:
१. वाहतूक कोंडी: जुन्या पेठांमधील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी विशेष नियोजन.
२. महिला रोजगार: प्रभागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
३. स्वच्छता व आरोग्य: कचरा व्यवस्थापनात सुधारणा करून ‘स्वच्छ व सुंदर प्रभाग २६’ हे ध्येय साध्य करणे.
४. पाणी पुरवठा: प्रत्येक घरापर्यंत सुरळीत पाणी पोहोचवण्यासाठी तांत्रिक त्रुटी दूर करणे.
हे देखील वाचा : राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद
विरोधकांवर टीकास्त्र
विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना थोरात यांनी सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधकांकडे विकासाचा कोणताही ठोस दृष्टिकोन नाही. केवळ टीका करण्यापेक्षा त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करायला हवे होते. महायुती आणि भाजप सरकारची विकासनीती पाहून जनता आम्हालाच भरघोस मताधिक्याने निवडून आणेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गुरुवार पेठ परिसरात निघालेल्या भव्य रॅलीत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या दौऱ्यामुळे प्रभाग २६ मध्ये भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.






