ठाकरे बंधु एकत्र येणार! संजय राऊतांची मोठी घोषणा
Thackeray Brothers Alliance: गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांच्या युतीच्या चर्चांमुळे सत्ताधारी महायुतीची धाकधुकही चांगलीच वाढली आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याच्या चर्चांही जोर धरू लागल्या आहेत. पण दोन्ही पक्षांकडून अद्याप या युतीाबाबत औपचारिक शिक्कामोर्तब झालेले नाही. पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची इच्छा आहे. अलीकडील भेटीगाठींमुळे हे संकेत मिळत असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत मोठे विधान केले आहे. दोन्ही ठाकरे बंधु आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढवतील असा दावा त्यांनी केला आहे. पण राऊत यांच्या या विधानामुळे राजय वर्तुळात मात्र चर्चांना आणखी जोर मिळण्याची शक्यता आहे..
संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीबाबत मोठे संकेत दिले आहेत. “मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण अशा सर्व ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढवतील. या सर्व महानगरपालिकांबाबत आमच्यात चर्चा सुरू आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची वज्रमुठ कोणीही तोडू शकत नाही.” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राज ठाकरे चुकीचे काही बोलले नाहीत. मुंबई, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली यांसह इतर महापालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहोत. अनेक ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हीच मराठी माणसाची ताकद आहे. आता कोणतीही अघोरी ताकद चालणार नाही,” असे राऊत म्हणाले. दरम्यान, मटण-चिकन विक्रीवरील बंदीच्या मुद्द्यावर राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. “असा स्वातंत्र्य दिन आम्ही पाहिला नाही. यांनी देश धर्मांध केला आहे. काँग्रेसच्या काळात असे काही झाले नाही. कत्तलखाने शासकीय सुट्टीमुळे आधीच बंद आहेत,” असे ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि मराठी एकजूटीसाठी ठाकरे बंधूंनी आपली तलवार उपसली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक या महापालिकांच्या निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार आहेत. असल्याची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली.
Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला
महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नावर राजकीय चर्चा रंगल्य असतानाच दोन्ही नेत्यांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनंतर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनांपासून सामाजिक कार्यक्रमांपर्यंत एकत्र दिसू लागले आहेत. मनसे आणि ठाकरे गटाची खरी ताकद मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांसाठी ठाणे महापालिका अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. शिवसेना ठाकरे गटासाठी ही महापालिकेवर सत्ता मिळवणे म्हणजे पक्ष फोडीचा बदला घेण्यासारखे आहे. कारण याच महापालिकेतून एकनाथ शिंदे यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. आजही त्यांचे ठाणे महापालिकेवर वर्चस्व आहे.
मनसेलाही या महापालिका क्षेत्रात चांगले मतदारसंघीय बळ आहे. 2007 च्या निवडणुकीत मनसेचे 3, तर 2012 मध्ये 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2017 मध्ये एकाही नगरसेवकाला विजय मिळवता आला नाही. दुसरीकडे, शिवसेनेचे 2007 मध्ये 48, 2012 मध्ये 53 आणि 2017 मध्ये 67 नगरसेवक निवडून आले होते. मात्र फुटीनंतर या 67 पैकी केवळ 3 नगरसेवक ठाकरे गटात राहिले असून उर्वरित शिंदे गटात गेले आहेत.