टोल मुद्द्यावरून ठाकरे शिवसेना आक्रमक टोल नाका पाडला बंद
कोल्हापूर : ‘देणार नाही, देणार नाही, टोल आम्ही देणार नाही…’ शिवसेना जिंदाबाद…फडणवीस सरकारचे करायचं काय? खाली डोकं वर पाय…अशा जोरदार घोषणाबाजी करत गुरुवारी किणी टोलनाक्यावर टोलविरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ टोल नाका बंद पाडण्यात आला.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, त्याचबरोबर सध्या रस्ते कामे सुरू आहेत. ही कामे अर्धवटच आहेत. याबाबत हायकोर्टने सुद्धा टोल वसुली करू नये असा निर्णय दिला आहे. तरीसुद्धा शासनाकडून ठेकेदाराच्या मार्फत टोल वसुली केली जाते. या विरोधात वाहनधारकांच्या तीव्र भावना असल्याने आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने किणी टोलनाक्यावर टोल विरोधात आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी हातात भगवे ध्वज घेऊन टोल नाक्याच्या दिशेने आगेकूच केली. यावेळी शिवसैनिकांनी टोल नाका बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याने टोल नाक्यावरील लाईन रिकाम्या करण्यात आल्या. त्यानंतर आंदोलन बाजूला होऊन महामार्गावरच उभा राहून जोरदार घोषणाबाजी केली.
रस्ते महामार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून, महामार्गावर टोल वसुली करता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने न्यायालय निकषानुसार कागल, सातारा या मार्गावरील किणी आणि तासवडे महामार्ग तातडीने टोलमुक्त करावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.