माणिकराव कोकाटेंवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याची चर्चा (फोटो- ani)
पुणे/Devendra Fadnavis: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्र्यांच्या वक्तव्यांवर नाराज असल्याचे समजते आहे. याबाबत त्यांनी मित्रपक्षांशी देखील चर्चा केल्याचे समजते आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत सापडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ समोर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले होते. त्यानंतर कोकाटे यांनी त्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना शेतकरी नव्हे तर शासन भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले. त्यांनी केलेलं विधान मी ऐकले नाही, मात्र त्यांनी असे विधान केले असल्यास आमच्यासाठी ते भूषणावह नसल्याचे फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या वक्तव्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे समजते आहे. अजित पवार आणि कोकाटे यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा फैसला होण्याची शक्यता आहे. तसेच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्र्यानी संकेत दिले असल्याचे समजते आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठे घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारवाई न केल्यास काही केले तरी चालते असा समज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे समजते आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा जो परिसर आहे तो परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. माझी आणि त्यांची अजून भेट झालेली नाही. पण सोमवारी त्यांची आणि माझी भेट होईल, असे अजित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वच मंत्र्यांना सांगितलेले आहे की आपण नेहमी भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे असे स्पष्टपणे आम्ही तिन्ही नेत्यांनी सूचना दिलेल्या आहेत.