राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा (फोटो- istockphoto)
धुळे: गेले काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे.
साक्री तालुक्यात मोठे नुकसान
साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, गरीब कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. मोहने गुंजाळ गावात एका वयोवृद्ध महिलेच्या घराची पडझड झाल्याने तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मोहने गुंजाळ येथील सुरीबाई साधू अहिरे (वय अंदाजे 70) या शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. दरम्यान, जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने त्यांच्या गरीब घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
मोहने ग्रामपचायतीचे सरपंच जितू गावित यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या गरीब महिलेच्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याची मागणी केली आहे. सरपंच गावित यांनी यावेळी सांगितले की, अवकाळी पावसाने गरीब लोकांचे मोठे नुकसान केले आहे. सुरीबाईं सारख्या निराधार महिलांचे घर कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
– जितू गावित, सरपंच
दरम्यान, तलाठ्यांनी गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. या वेळी सरपंच आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मोहने गुंजाळ हे 500 लोकवस्तीचे छोटे गाव असून, येथील अनेक कुटुंबांना या नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. आता प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा ग्रामस्थांना आहे.
अवकाळीने कोल्हापूरला झोडपले
Kolhapur Rain: अवकाळीने कोल्हापूरला झोडपले; बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची उडाली तारांबळ
सामानांची बांधाबाध करताना व्यापारी वर्गाची त्रेधा उडाली होती. हातकणंगलेचा बाजाराचा दिवस शहरवासीयांसह परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार खरेदीसाठी बाजारात आले होते. अचानकपणे धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे एकच धावपळ उडाली, मिळेल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसह ग्राहकानी आश्रय घेतला. अशीच परिस्थिती, इचलकरंजी, कुंभोज, कोरोची, आळते, पेठ वडगाव येथे पहावयास मिळाली. सुमारे तासभर धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे बघेल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.