माजी नगरसेवकाचं कार्यालयावर अज्ञातांनी केली तोडफोड ; तलवारी घेऊन केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथ / दर्शन सोनवणे : अंबरनाथमधील माजी नगरसेवकाच्या कार्यालयात अज्ञात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या दरम्यान हातात नंग्या तलवारी घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. पूर्वेच्या बिकेबिन रोड दत्त कुटीर येथील एक्सिस बँक जवळील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी क्रिष्णा गुप्ता (२२) या कर्मचाऱ्याने तलवारीच्या हल्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्लास्टिकचे टेबल पुढे करून तलवारीचे वार टेबलावर झेलले.
सुदैवाने हल्ला झाला त्यावेळी माजी नगरसेवक रोहित महाडिक आणि त्यांचे वडील कार्यालयात उपस्थित नसल्याने दोघेही थोडक्यात बचावले आहेत. शस्त्रधारी हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून थेट कर्मचाऱ्यावर आणि कार्यालयाच्या काचांवर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी कार्यालयाच्या काचा फोडुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या २३ सेकंदात हल्लेखोरांनी कार्यालयाची नासधूस करून घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी याप्रकरणी क्रिष्णा गुप्ता याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आशुतोष कराळे उर्फ डक्या (२३), गणी रफिक शेख (२५) आणि इतर दहा अज्ञात आरोपींविरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणी पोलिसांची तीन विविध तपास पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच उल्हासनगर क्राईम ब्रांचकडुन देखील समांतर तपास सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.आम्ही करत असलेले समाजकार्य आणि विकासकामे याबद्दल काहींच्या मनात राग असू शकतो. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लवकरच या आरोपींना अटक करावी, या समाजकंटकांमुळे आमच्या जीवाला धोका आहे.