कोट्यवधीच्या पुलाच्या कामासाठी फक्त चार कामगार, कामात दिरंगाई केल्यास दंड
कल्याण शीळ रोडवरील पलावा जंक्शन पूलाचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी कल्याण शीळ रोड वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडींला सामोरे जावं लागतं. या पुलांच्या कामाला गती मिळावी यासाठी आज (6 ऑगस्ट) मनसे आमदार राजू पाटील आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी या पूलाची पाहणी केली. यावेळी काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. पुलावर अवघे चार कामगार काम करत असल्याचे पाहून आमदार राजू पाटील संतापले.
कोट्यावधी पूलाच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत. हे काम होणार कसे? असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. त्यानंतर एम एस आर डी सी चे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी ठेकेदाराला दंड आकारत कारवाई करण्यात येईल अशी तंबी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. आता या दौऱ्यानंतर तरी या पुलांची कामे जलदगतीने पूर्ण होतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे .
कल्याण शिळ रस्त्यावर एकीकडे सुरू असलेले मेट्रोचे काम तर दुसरीकडे संथगतीने सुरू असलेली पलावा जंक्शन पुलाचे काम यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे .या पुलाच्या कामांना गती मिळावी यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी एम एस आर डी सी चे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांच्यासह दोन्ही पूलांची पाहणी केली. यावेळी आमदार राजू पाटील यांनी पलावा उड्डाणपूल कामाआड येणाऱ्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली , हे बेकायदा बांधकाम लवकरच काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
धक्कादायक म्हणजे पुलाच्या कामासाठी फक्त एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम करत असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार राजू पाटील यांनी पत्री पूल, दिवा पूल यांच्यासह दोन्ही पुलांच्या कामात हलगर्जीपणा ,दिरंगाई केली जात असल्याने या पुलांची कामे रखडली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले .तर एम एस आर डी सी चे सहाय्यक संचालक जिंदाल यांनी देखील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत नाराजी व्यक्त करत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला खडे बोल सूनावले.
कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही ,कामात जो विलंब होत आहे त्यासाठी तुम्हाला दंड आकारण्यात येईल अशी तंबी दिली . हे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे नाहीतर कारवाई करणार असा इशारा देखील दिला .