काशीमीरा ठाणे/ विजय काते : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी रात्री सुमारे 9 च्या सुमारास आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. काशीमीरा पोलिस ठाण्याच्या समोरून जात असलेल्या एका टेम्पोचे टायर खोल खड्ड्यात गेल्याने पडले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालकाने आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. सध्या महामार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असले, तरी काशीमीरा पोलिस ठाण्याच्या समोर सिमेंट रस्ता संपल्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे टेम्पोचे टायर निघून पडले असल्याची माहिती मिळाली.स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “जर वेळेत हे खड्डे बुजवले असते किंवा या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असता, तर आज हा अपघात घडला नसता.” महामार्गावरील अपुऱ्या देखभालीमुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असून, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
याआधी देखील काही दिवसांपूर्वी वसईजवळ मुंबई अहमदाबाद मार्गावर दिवसरात्र होणाऱ्या वाहतूक कोंडीला जवळपासच्या गावातील गावकरी कंटाळले आणि त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. सततच्या वाहतूक कोंडीमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-48) ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली होती. गुजरातच्या दिशेने जाताना महाराष्ट्र राज्याच्या सीमाभागातील नायगाव-चिंचोटी-वसई परिसरातील 100 हून अधिक गावकऱ्यांनी वाहतूक कोडींना वैतागून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की, सतत या वाहतूकीच्या समस्येंमुळे आम्हा गावकऱ्यांचे हाल होतायतं. आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी.रोजच्या त्रासाला नागरिक इतके मेटाकुटीला आले तरीही प्रशासन आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. ही समस्या काही क्षुल्लक नाही तरी देखील प्रशासन मूग गिळून गप्प का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात, ग्रामस्थांनी लिहिलं होतं की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या प्रकल्प संचालक आणि इतर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मुंबई अहमदाबादनजीक असलेल्या गावातील रहिवाशांचे जीवन कठीण झाले आहे. “आम्ही प्रत्येकवेळी तक्रार दाखल केली आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हायलाच हवी अशी आमची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. परिरसरात इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून देखीस स्थानिक प्रशासन यावर ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.






