ST बस जागेवर होणार 'सौर ऊर्जा प्रकल्प' होणार असल्याची प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली (फोटो - सोशल मीडिया)
Solar energy project On ST bus site: मुंबई: एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ‘ सौरऊर्जा प्रकल्प ‘ उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा महत्वकांक्षी ‘ सौर ऊर्जा हब ‘ उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे.
ते या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, भविष्यात संपूर्ण राज्याला पथदर्शक ठरेल असा एक महत्त्वाकांक्षी ‘ सौर ऊर्जा प्रकल्प ‘ एसटी महामंडळाच्या माध्यमातून आकारास येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत महामंडळाच्या ज्या जागेवर खाजगी- सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प साकारले जाणार आहेत, त्या बरोबरच उरलेल्या मोकळ्या जागेमध्ये ‘ सौर ऊर्जा शेती ‘ द्वारे वीज निर्मिती करण्याचे काम हाती घेतले जाईल. सध्या एसटी महामंडळाला दैनंदिन आस्थापना वापरासाठी वर्षाला १५ मेगॉवाट इतकी वीज लागते. त्यासाठी एकूण २५ ते ३० कोटी रुपये बिल महावितरण कंपनीला भरावे लागते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भविष्यात येणाऱ्या हजारो इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग साठी सुमारे २८० मेगावॅट इतकी वीजेची गरज लागणार आहे. सदर वीज एसटी महामंडळाने सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार केल्यास भविष्यात वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चामध्ये बचत होणार आहे. त्यामुळे खर्चातील ही बचत भविष्यात एसटीचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पुढे येऊ शकते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शासनाच्या ओसाड जागेवर एसटी उभारणार सौरऊर्जा प्रकल्प
अर्थात, ३०० मेगॉवाट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प राज्यातील एसटीच्या विविध जागेवर उभारला जाणार आहे. त्यासाठी गरज पडल्यास शासनाच्या ओसाड जागेवर शासनाच्या परवानगीने व नाम मात्र भाडे आकारणी करुन सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत देखील यासाठी उपयोगात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक अनुदानासाठी शासनाकडे वेळोवेळी हात पसरावे लागणार नाहीत. म्हणून भविष्यात एसटीचा हा ‘सौर उर्जा हब ‘ संपूर्ण राज्यासाठी सौर ऊर्जा निर्मितीचा एक पथदर्शक प्रकल्प म्हणून राज्यात नावाजला जाईल असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.






