‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो काही खात-पित होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
राज ठाकरे म्हणाले की, देवावर श्रद्धा असणे आणि आपल्या धर्माचा अभिमान असणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचे रूपांतर धार्मिक कट्टरतेत होता कामा नये. देशात निर्माण झालेल्या वातावरणामागे इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी एका कथाकाराचे नाव न घेता रामायणाबाबत सांगितल्या जाणाऱ्या काही कथित दाव्यांवर उपरोधिक टीका केली. संबंधित कथाकार रावणाची एक लाख मुले आणि दीड लाख नातवंडे युद्धात मारली गेल्याचे सांगतात, असा उल्लेख त्यांनी केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे सवाल केला की, रावणाला दहा डोकी असल्याचे आपल्याला माहिती आहे; पण त्याला एक लाख मुलं होती? मग त्याला काही खायला-प्यायलाही वेळ मिळत होता की नाही? त्यांच्या या टिप्पणीवर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
कथावाचकाच्या प्रवचनातील रावणाच्या ‘एक लाख पुत्रां’च्या दाव्यावर राजसाहेबांचा मिश्किल आणि सूचक टोला.#RajThackeray #MNSAdhikrut pic.twitter.com/XQYLXlM2Q9 — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 6, 2026
यानंतर राज ठाकरे यांनी आणखी एका कथित दाव्याचा उल्लेख केला. राम-रावण युद्धात वापरण्यात आलेली शक्तिशाली अस्त्रे चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागू नयेत म्हणून प्रभू श्रीरामांनी हनुमानाला ती सुमारे 10 हजार किलोमीटर दूर नेऊन ठेवण्यास सांगितले आणि त्या जागेला ‘अस्त्रालय’ म्हटले गेले. पुढे त्याच ‘अस्त्रालय’चे नाव ‘ऑस्ट्रेलिया’ झाले, असा दावा संबंधित कथाकार करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यावर त्यांनी उपरोधिकपणे, ‘अस्त्रालयाचं ऑस्ट्रेलिया झालं असेल, तर मग हॉलंड, इंग्लंड आणि न्यूझीलंडचं काय?’ असा सवाल केला. या टिप्पणीवरही सभागृहात हशा पिकला.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सण-उत्सवांमध्ये वाढलेल्या डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टीमच्या वापरावरही नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उत्सवांमध्ये उत्तर भारतातील डीजे-डॉल्बी संस्कृती आणली जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गोविंदा-दहीहंडी उत्सवात काही ठिकाणी महिलांना स्टेजवर नाचण्यासाठी बोलावले जाते, अशा प्रकारांवरही त्यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्राने आपली संस्कृती जपून सण कसे साजरे करायचे याबाबत काही नियम आणि मर्यादा असायला हव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सण-उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाइटमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, तर डॉल्बी सिस्टीमचा अतिप्रचंड आवाज हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो, असेही राज ठाकरे म्हणाले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव ज्या उद्देशाने सुरू केले, त्या मूळ हेतूचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माच्या नावाखाली भान हरवू नका; सण साजरे करा, मात्र धार्मिक कट्टरता समाजासाठी घातक ठरू शकते, असा संदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.






