फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कल्याण पूर्वेतील महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीचे पडसाद कल्याण पश्चिमेत देखील उमटले असून कल्याण पूर्वेत महायुतीच्या वतीने असलेल्या भाजपाच्या अधिकृत उमेदवारासमोर शिवसेनेने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आज आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे माजी आमदार तथा भाजपा कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख नरेंद्र पवार यांनी सांगितले. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पश्चिमेत मोठे शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आपल्या समर्थकांसह वाजत गाजत भव्य रॅली काढून आपली ताकद दाखवली.
कल्याण पूर्वेतील बंडखोरीचे पडसाद कल्याण पश्चिममध्ये
महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमने केला होता, पण कल्याण पूर्वेत भाजपाच्या अधिकृत उमेदवारासमोर बंडखोरी झाली आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला असून पूर्ण ताकदीनिशी कल्याण पश्चिम विधानसभा जिंकून दाखवेल असा विश्वास हा जनसमुदाय दाखवून देत आहे. नेत्यांनी युतीचा धर्म पाळण्यास सांगितला आहे परंतु कार्यकर्त्यांची ऐकण्याची मनस्थिति नाहीये त्यामुळे हा अपक्ष अर्ज दाखल करत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.
हे देखील वाचा-
बंडखोरीमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता
कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये थेट सामना होणार होता मात्र नरेंद्र पवार यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत जर पक्षश्रेष्ठींना कल्याणमधील दोन्ही मतदारसंघातील बंडखोरी शमवता आल्यास महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो अन्यथा या बंडखोरीमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कल्याणमधील दोन्ही मतदारसंघ हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येत असल्याने हे दोन्ही मतदारसंघ महायुतीकरिता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकरिता महत्वाचे आहेत.
कल्याण पूर्वेत महेश गायकवाडांचा अपक्ष अर्ज
कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड हे भाजपकडून विद्यमान आमदार आहेत. मात्र शिंदेगटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्थानकात केलेल्या गोळीबारामुळे ते जेलमध्ये आहेत. त्यामुळे भाजपने गायकवाड यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली त्यामुळे या उमेदवारीविरुद्ध शिंदे गटाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीचे थेट पडसाद कल्याण पश्चिममध्ये दिसून येत आहेत. महेश गायकवाड यांच्या बंडखोरीमुळेच माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज भरला आहे असे त्यांनी सांगितले आहे.
कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे इथे पारडे जड आहे. मात्र या जागांवर बंडखोरीचे ग्रहण महायुतीसाठी घातक ठरणार आहे.