कोपरीत रंगला थरांचा थरथराट...उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची निष्ठेची दहीहंडी जल्लोषात
ठाणे : ठाण्यात रविवारी थरांचा थरथराट रंगला. निमित्त होते ते म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ (पाटील) यांनी कोपरीच्या अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या निष्ठेच्या सराव दहीहंडीचे… या निष्ठेच्या हंडीला ठाणे,नवी मुंबई आणि डोंबिवली परिसरातील तब्बल ५० गोविंदा पथकांनी सलामी दिली. वागळे इस्टेट, सी पी तलाव गोविंदा पथकाने नऊ थर लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र आठ थर लावुन त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले तसेच निष्ठेची दहीहंडी फोडण्याचा मान सीपी तलाव गोविंदा पथकाने पटकावला. कोपरीच्या आई चिखलादेवी गोविंदा पथकाने सात थर लावले तर, शिवतेज महिला पथकानेही पाच थरांना गवसणी घालत बाजी मारली.
युवासेनेचे धडाडीचे नेते राजेश वायाळ (पाटील ) यांच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सराव दहीहंडी उत्सवाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, प्रदीप शिंदे, ज्योती कोळी,कृष्णकुमार कोळी,प्रमिला भांगे, रोशनी शिंदे,जेष्ठ शिवसैनिक सुभाष म्हसकर,ठाणे मनसेच्या महिला शहर अध्यक्षा समिशा मार्कंडे,धनश्री राजन विचारे आदींसह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. ठाणे पूर्व परिसरातील उत्सवाचे केंद्र ठरलेल्या अष्टविनायक चौकात रविवारी मुंबई-ठाणेकरांसाठी एक भव्य हंडी, महिलांसाठी स्वतंत्र हंडी आणि स्थानिक कोपरीकरांसाठी खास मानाची हंडी उभारण्यात आली होती. सकाळपासूनच ढोलताशांचा गजर, गोविंदा रे गोपाळा… अशा घोषणाच्या गुंजारवात अष्टविनायक चौक गजबजून गेला होता. लहानग्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी दादुस आला रे…या रंगारंग कार्यक्रमाने मनोरंजन करीत गोविंदा पथकांसह उपस्थितांची स्फूर्ती वाढवली.
निष्ठेच्या दही हंड्यांवर थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. एकूण १ लाख ५० हजार एकशे एक रुपयांचे बक्षिस व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. याशिवाय सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात आली. या उत्सवात महिलांच्या सात गोविंदा पथकांनी दमदार सहभाग नोंदवत मराठमोळ्या मर्दानीचे दर्शन घडवले. याद्वारे महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश आयोजकांनी यशस्वीपणे पार पाडला.
उत्सवाचे आयोजन करताना गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. गोविंदाकरीता सेफ्टी बेल्ट, प्रथमोपचार, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि स्वयंसेवकांची टीम दिवसभर सज्ज होती.
धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे ‘ठाणे’ ही दहीहंडीची पंढरी म्हणून नावारूपाला आली. त्याच निष्ठेतुन कोपरीत दहीहंडी उभारून हिंदु संस्कृती जपण्यासह गोविंदा पथकांना सरावाची संधी उपलब्ध करून देता आली. ‘दहीहंडी म्हणजे केवळ थर लावणे नाही, तर ती असते समाजाला बांधुन ठेवणारी भावना आणि एकजुटतेची ओळख, अशी प्रतिक्रिया आयोजक राजेश वायाळ यांनी दिली.