मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील मतदार याद्यांचा घोळ कायम; अंतिम यादीतही प्रचंड गोंधळ, बोगस मतदानाची भीती
महापालिकेच्या कर विभागाने विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांची २४ प्रभागनिहाय विभागणी केली. मात्र प्रारूप यादीत एका-एका प्रभागातील हजारो मतदारांची नावे आजूबाजूच्या तसेच तब्बल ८ ते १० किमी अंतरावरील इतर प्रभागांत टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या अफरातफरीविरोधात तब्बल ७४० हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. असे असतानाही अंतिम यादीत या त्रुटी कायम असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छूक उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.
अंतिम मतदार यादीत पाली-डोंगरी-तारोडी परिसरातील (प्रभाग २४) सुमारे १६०० मतदारांची नावे थेट भाईंदर पूर्वेतील जेसलपार्क परिसरातील प्रभाग २ मध्ये टाकण्यात आली आहेत. जेसलपार्कसह आसपासच्या निवासी संकुलांची नावे प्रभाग ३ व ४ मध्ये, तर प्रभाग ३ मधील मतदारांची नावे पुन्हा प्रभाग २ मध्ये टाकल्याचे दिसून येते. तसेच इंद्रलोक-पूजापार्क (प्रभाग १२), काशिमिरा (प्रभाग १४) आणि हटकेश (प्रभाग १३) येथील मतदारांची नावे मीरारोडच्या प्रभाग १८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी जवळपास सर्वच प्रभागांमधून येत आहेत.
महापालिकेने स्वतःच दुबार मतदारांची संख्या ४४,८६२ इतकी असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात वास्तव्यास नसलेले मतदारही हजारोंच्या संख्येने असल्याने दुबार आणि अस्तित्वात नसलेल्या मतदारांची एकूण संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदानाचा गंभीर धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी, हरकती आणि त्रुटी समोर येऊनही महापालिका प्रशासन व निवडणूक आयोगाने मतदार याद्या काटेकोरपणे दुरुस्त न करता त्या थेट अंतिम यादी म्हणून प्रसिद्ध केल्या. या याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर जरी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष रीतसर प्रती घेण्यासाठी इच्छूकांची मोठी गर्दी होत आहे. याद्यांची पडताळणी करताच सर्वच पक्षीय इच्छूक उमेदवारांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे, कारण संपूर्ण परिसरच दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे वास्तव समोर येत आहे.
अंतिम मतदार यादीतील घोळानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या नीलम ढवण, ज्योती शेवंते, तसेच मनसेचे हेमंत सावंत, सचिन पोपळे आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. यावेळी प्रारूप तसेच अंतिम मतदार यादीतील घोळ हा भाजपाच्या दबावाखाली पालिका प्रशासनाने केल्याचा गंभीर आरोप शिष्टमंडळाने केला. कर विभागातील कर्मचारी परिसराची संपूर्ण माहिती असताना देखील इतक्या मोठ्या चुका कशा झाल्या, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
यावर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी, “अंतिम मतदार यादीत आता कोणतेही बदल करण्याचे अधिकार नाहीत. मात्र तक्रारी स्वीकारल्या जातील; त्यावर विचार केला जाणार नाही,” असे स्पष्ट केले. तसेच कर विभागाच्या उपायुक्तांना बोलावून सदोष यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मनसे नेते सचिन पोपळे यांनी दिली.
मतदार याद्यांमधील या गोंधळामुळे मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन व आयोगाने तातडीने यावर ठोस उपाययोजना न केल्यास निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






