निवडणूक आयोग पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या पालिका निवडणूका जाहीर करण्यात आल्या (फोटो - सोशल मीडिया)
Local Body Elections : बारामती : राज्यामध्ये महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या टायमिंगवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन देखील पार पडले. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन संपताच दुसऱ्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी अनेक भूमिपूजन, लोकार्पण आणि पुतळ्याचे अनावर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगली आणि पुण्यातील अहिल्याबाई होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यानंतर संध्याकाळी निवडणूक जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली. यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोग आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळेवर संशय घेतला आहे.
हे देखील वाचा : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निवडणूक आयोगावर संशय घेतला आहे. रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या, असे म्हणायचे का? हा सर्व घटनाक्रम पहिल्यानंतर नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि कोण कोणाचं ऐकतंय हे स्पष्टं होतं, असा आरोप रोहित पवारांनी लावला.
हे देखील वाचा : पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता
तसेच आमदार रोहित पवार यांनी पुढे लिहिले आहे की, “लोकशाहीची अशी गळचेपी होताना मात्र आम्ही अनेक कारवाया होऊन देखील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, मात्र अशा एकाधिकारशाहीमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे,” असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 16, 2025
कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम?
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूका जाहीर केल्या आहेत. मतदानासह उमेदवारी अर्जाबाबत देखील तारीख जाहीर करण्यात आले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, अर्ज दाखल कऱण्याची तारीख- २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर आहे. तसेच उमेदवांरांच्या अर्जाची छाननी ३१ डिसेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख २ जानेवारी २०२६ असणार आहे. त्याचबरोबर चिन्हवाटप अंतिम उमेदवार यादीची तारीख ३ जानेवारी असणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तारीख १५ जानेवारी २०२६ असून मतमोजणी ही १६ जानेवारी २०२६ असणार आहे.






