फोटो सौजन्य: iStock
टिटवाळ्यातील प्रभाग क्रमांक ३ येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शेखर अप्पाराव वाकोडे यांचे नाव EVM मशीनवर चक्क शेख अप्पाराव वाकोडे असे दिसत असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच, उमदेवार शेखर वाकोडे वयानी देखील संताप व्यक्त केला आहे. यासोबतच, निवडणूक प्रक्रियेवर देखील प्रश्न विचारले जात आहे.
टिटवाळ्यातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच एक गंभीर प्रकार समोर आला. शरद पवार गटाचे उमेदवार शेखर वाकोडे हे स्वतः मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले असता, ईव्हीएम मशीनवर तसेच बाहेर लावण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावात चूक आढळून आली. शेखर वाकोडे यांच्या नावाऐवजी फक्त ‘शेख’ असे नाव नमूद करण्यात आले होते. या चुकीमुळे त्यांची ओळख, जात आणि धर्म बदलल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या प्रकरणावर शेखर वाकोडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या 5 वर्षांपासून आपण या परिसरात सातत्याने जनसंपर्क ठेवून मेहनत घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ईव्हीएम मशीनवर तसेच मतदान केंद्राबाहेरील अधिकृत डिस्प्लेवर आपले नाव चुकीच्या पद्धतीने दाखवून प्रशासनाने मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक मतदारांकडून आपल्याला फोन येत असून, यादीत तुमचे नाव का नाही, अशी विचारणा केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नाव दुरुस्त करण्याची विनंती केली होती, मात्र ती नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार आपल्या बाबतीत झालेला गंभीर अन्याय असून, या प्रभागातील मतदान प्रक्रिया तात्काळ थांबवून निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी शेखर वाकोडे यांनी केली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रशासनावर टीका केली आहे. तपासे यांनी सांगितले की, राज्यात सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदार यादीत गोंधळ पाहायला मिळत आहे, मात्र टिटवाळ्यात तर हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे थेट उमेदवाराची ओळखच बदलल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला गेला आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अन्यायाविरोधात आम्ही शांत बसणार नसून, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणार असल्याचे महेश तपासे यांनी जाहीर केले आहे.






