कल्याण : सोन्याच्या किंमती एकीकडे दिवसागणिक नवनविन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हारही टाकून दिल्याचा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी या सोन्याच्या महागड्या हाराबाबत कोणताही मोह न ठेवता संबंधित महिलेला हा हार परत मिळवून दिला आहे. कलियुगात माणसाला माणुसकी राहिलेली नाही असं म्हटलं जात असतानाच सफाई कर्माचाऱ्याच्या या चांगुलपणाने सर्वांची मनं जिंकून घेतली.
KDMC आणि सुमित कंपनीच्या सफाई कामगारांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे आज सकाळीही कल्याण पूर्वेच्या विविध भागातून कचरा संकलनाचे काम सुरू होते. कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळीच्या परिसरातून गोळा झालेला हा सर्व कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर पाठवण्यात येत होता. त्याचदरम्यान सकाळी कचरा घेण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कचरा देताना त्यामध्ये नजरचुकीने एका महिलेकडून सोन्याचा हारही टाकला गेल्याची तक्रार सुमित कंपनीचे 4 जे प्रभागाचे अधिकारी समीर खाडे यांना केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्याकडून प्राप्त झाली.
त्यावरून ही तक्रार आलेल्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी गेलेल्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना समीर खाडे यांनी या सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. आणि त्यांनी लगेचच कचरा संकलन केलेली ही गाडी कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर नेण्याच्या सूचना गाडीचालकाला केली. तसेच हार गहाळ झालेल्या महिलेलाही या इंटरकटिंग पॉइंटवर बोलवण्यात आले. त्यावेळी या गाडीमध्ये गोळा करण्यात आलेला कचरा संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांच्या आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष वेगळा करण्यात आला. आणि त्यामध्ये या महिलेकडून चुकून आलेल्या सोन्याच्या हाराचा यशस्वीपणे शोध घेऊन तो हार पुन्हा त्या महिलेच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सुमित कंपनीच्या समीर खाडे यांनी दिली.केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे या महिलेसह सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे. तर आपला महागडा सोन्याचा हार सुखरूप परत मिळाल्याबद्दल या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.