शक्ती चक्रीवादळाचा धोका वाढला (फोटो- istockphoto)
1. अरबी समुद्रात निर्माण झाले ‘शक्ती’ चक्रीवादळ
2. तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता
3. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
मुंबई: ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या प्रादेशिक केंद्र, कुलाबा (मुंबई) येथून प्राप्त माहितीनुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळाने मागील सहा तासांत सुमारे आठ किलोमीटर प्रतितास वेगाने वायव्य दिशेने हालचाल केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता हे चक्रीवादळ २२.० अंश उत्तर अक्षांश आणि ६६.४ अंश पूर्व रेखांशाजवळ केंद्रित होते.
द्वारका (गुजरात) पासून सुमारे २८० किमी पश्चिमेला
नालिया पासून २९० किमी पश्चिम-नैऋत्येला
कराची (पाकिस्तान) पासून ३३० किमी दक्षिण-नैऋत्येला आणि
पोरबंदरपासून ३२० किमी पश्चिमेला
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ ४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते ५ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम-नैऋत्येकडे सरकून उत्तर आणि मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचेल.
India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली
मच्छीमारांना सूचना: समुद्रात जाणे टाळा
भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कडक सूचना दिल्या आहेत की, पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व किनारी जिल्हा प्रशासनांना निर्देश दिले आहेत की, या सूचनेची माहिती सर्व मच्छीमार आणि किनारी गावांतील नागरिकांपर्यंत त्वरीत पोहोचवावी. सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
मान्सून संपला असला तरी, देशाच्या अनेक भागात पाऊस सुरूच आहे. याचदरम्यान आता भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम जाणवू शकतो, ज्यामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा परिणाम ४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवू शकतो.