मुंबई : मुंबईमध्ये गेल्या शनिवारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply in Mumbai) करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठयांमध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. २६ जूनला या सर्व धरणामध्ये नियमित पाणी साठ्यासोबत ६.५७ टक्क्यांवर आली होती. ती पाण्याची पातळी (Water Level) ३० जूनला सकाळी १०.८८ टक्के एवढी झाली. त्यामुळे चार दिवसांमध्ये चार टक्के इतका पाणीसाठा वाढलेला असून राखीव साठा मिळून पाणीसाठा हा १६.५५ टक्के इतका आहे.
मागील वर्षी ३० जून या दिवशी १०.५१ टक्के इतका पाणीसाठा तुलनेत यंदाचा पाणीसाठा अधिक असल्याचे दिसून आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब काही प्रमाणात समाधानकारक आहे. मुंबईला दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य चेतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलावामधील नियमित पाणी साठा हा ७ टक्क्यांपर्यंत आला होता.
तहान भागवण्यासाठी लाखोे लिटरची आवश्यकता
मुंबईला वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर म्हणजेच १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. त्यातुलनेत ३० जूनपर्यंत या सर्व धरणामध्ये १ लाख ५१ हजार ४१२ लिटर एवढा पाण्याचा साठा निर्माण झाला आहे, जो याचदिवशी मागील वर्षी १ लाख ५२ हजार १४३ दशलक्ष लिटर इतका होता. तर ३० जून २०२१ हा पाणी साठा २ लाख ५७ हजार ८३४ दशलक्ष लिटर इतका होता. त्यामुळे नियमित पाणीसाठा १०.८८ टक्के इतका झाला आहे. तर राखीव पाणीसाठा मिळून १६.५५ टक्के इतका झाला आहे.