Photo Credit- Social Media
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येत आहे. या निकालाच्या 12 दिवसांनंतर गुरुवारी आझाद मैदानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सुरक्षात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने आझाद मैदानाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात असणार आहे.
हेदेखील वाचा : देवेंद्र फडणवीस आज घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक बडे नेते राहणार उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि 14 राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे चोख बंदोबस्त ठेवणे हे मुंबई पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे. अद्ययावत सुरक्षा उपायांतर्गत, राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ), शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, लढावू आणि बॉम्बचा शोध आणि त्याला निकामी करणाऱ्या पथकांसह विशेष पथके महत्त्वाच्या ठिकाणी तैनात कण्यात आली आहेत. ड्रोनद्वारे पोलिसांची जागोजागी नजर राहणार आहे. साध्या वेषातही पोलीस अधिकारी ठिकठिकाणी, जमावामध्ये तैनात केले जाणार आहेत.
शपथविधी सोहळ्यादरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय गृहविभागाने अतिरिक्त खबरादारी घेतली आहे. माजी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड कमांडो कर्नल तुषार जोशी यांना तैनात करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त, १५ पोलीस उपायुक्त आणि २९ सहायक पोलीस आयुक्त तैनात असणार आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
कोणत्याही बेवारस वस्तू, तसेच संशयित कार्यवाहीची सूचना पोलिसांना द्यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस हेल्पलाईन नंबर 100 आणि 112 वर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
लोकलचा वापर करा
मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे. कार्यक्रमस्थळी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आझाद मैदानात पार्किंग सुविधेच्या कमतरतेमुळे वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना सार्वजनिक परिवहन सेवा तसेच लोकल ट्रेनने येण्याचे आवाहन केले आहे.
हेदेखील वाचा : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार का? अजित पवारांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘एकनाथ शिंदे…’