संग्रहित फोटो
या पक्ष प्रवेशात काँग्रेस विचाराचे अधिक कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. हिंदुत्वाचे काय ? असा प्रश्न निर्माण होतो. यावर भाजपचे उत्तर असे असते की हिंदुत्वाचे राजकारण पुढे रेटायचे असेल तर काही तडजोडी कराव्या लागतात. पक्षाने अजित पवार यांच्याशी युती केली तेव्हाही हेच समर्थन केले गेले. शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मानणाऱ्या पवारांशी राजकीय तडजोड केली असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तेव्हा लोकसभा हे भाजपचे टार्गेट होते. यावेळी पुणे आणि आगामी विधानसभा अशी टार्गेट्स आहेत.
खडकवासला विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक सचिन दोडके यांना भाजपमध्ये घेण्यात आले आहे. तर वडगाव शेरी मतदार संघातील पठारे, गलांडे या प्रभावशाली नेत्यांना पक्षाची दारे खुली केली आहेत. या दोन्ही मतदार संघात भाजपची मते वाढली आहेत, पण संघटनेचा पाया अधिक भक्कम करण्यावर नेत्यांनी भर दिला आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये असेच इन्कमिंग झाले होते. पक्षाचे ९२ नगरसेवक निवडून आले. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नगरसेवक चाळीसच्या आसपास होते. त्याही वेळी निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय अशा तक्रारी झाल्या होत्या. पण, निवडून येण्याची क्षमता हाच काँग्रेसचा निकष भाजपनेही लावला होता. सत्तेच्या आधारे बंडोबांना कुठेतरी सामावून घेता येईल अशी तयारी नेत्यांनी केली आहे. पुढील आठवडा हा पक्षात नाराजांची समजूत काढणे यासाठी राहील. भावनिक आवाहन करण्यासाठी भाजपकडे अनेक मुद्दे आहेतच.
सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ
पुणे शहरातील २० ते २५ जणांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. यापूर्वीही शिवसेना उबाठाचे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये आलेले आहेत. दोन वर्षात अनेकांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत. त्यामुळे विरोधकांना काही ठेवले आहे की नाही? अशी चर्चा होऊ लागली आहे. सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची धावपळ होणार आहे, हे दिसू लागले आहे. ४१ प्रभागात मिळून १६३ उमेदवार उभे करायचे आहेत आणि मोठ्या आकाराच्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे. याची जाणीव विरोधकांना झाली असावी.






