अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यामध्ये युती होणार असल्याचा दत्तात्रय धनकवडे यांचा दावा (फोटो - सोशल मीडिया)
Pune PMC Elections: पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नगर पंचायत आणि नगर परिषदेचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये महायुती महाविकास आघाडीवर भारी पडली आहे. भाजपने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये यश मिळवले असून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाने देखील अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. मात्र ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी एकत्रित लढणार का याची चर्चा सुरु आहे. याबाबत अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी मोठा दावा केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणूका जाहीर केल्या आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान 15 जानेवारीला पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी युतीची गणिते समीकरणे बदलली आहेत. ठाकरे बंधू देखील मागे हेवेदावे विसरुन मुंबईमध्ये युती करत आहे. याचबरोबर मुंबईमध्ये महायुतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढतील आणि त्यासाठी चर्चा सुरु असल्याचे वक्तव्यअजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले.
हे देखील वाचा : संभाजीनगरमध्ये सत्तारांचा ‘गड’ अभेद्य, वैजापुरात भाजपची बाजी; कन्नड-खुलताबादमध्ये काँग्रेसचा ‘धक्का’!
प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यामध्ये आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे. धनकवडे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, लवकरच जाहीर घोषणा होईल. दोन्ही पक्षातील नेत्यांचे बोलणं झाले आहे. ताई आणि दादांची याबाबत चर्चा झाली आहे. तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत. येत्या दोन दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
हे देखील वाचा : आता माफी मागणार का…? हिजाब वादाचा प्रश्न ऐकून नितीश कुमार यांनी थेट जोडले हात
पुढे ते म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येण्यावर चर्चा झाली आहे. प्रशांत जगताप शहराचे अध्यक्ष असून, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आणि अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यातील चर्चा पूर्ण झाली असून तुतारी पण घड्याळावरच निवडणूक लढवणार आहे, असा दावा त्यांनी केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे राष्ट्रवादीमधील वाद पुण्यात संपणार असल्याचा दावा केला जात आहे.






