संग्रहित फोटो
या पक्षप्रवेशात काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख, मुक्तार शेख, मनसेच्या माजी नगरसेविका अस्मिता शिंदे तसेच माजी नगरसेवक मिलिंद काची आणि श्वेता चव्हाण यांचा समावेश आहे. शनिवारी भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश झाल्याने पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रत्येक प्रभागासाठी २० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मुलाखतींच्या वेळेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.
पुण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी टोळ्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत आंदेकर, गजा मारणे आणि घायवळ टोळीवर धडक दिली होती. या कारवाईनंतर गुन्हेगारी टोळ्यांतील काही सदस्य आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती राजकारणाकडे वळत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
अशातच गजा मारणे यांची पत्नी व माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. जयश्री मारणे या अजित पवार यांच्या भेटीसाठी बारामती हॉस्टेल येथे पोहोचल्या होत्या. त्या २०१२ साली कोथरूड मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. २०२२ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आगामी महापालिका निवडणुकीत त्या इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, घायवळ टोळीशी संबंधित काही नावे तसेच आंदेकर टोळीतील सदस्यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुण्यातील राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या सहभागावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार का, तसेच आगामी निवडणुकीत त्यांची नेमकी भूमिका काय असणार, याकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






