मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. पण कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती का? असा सवाल उपस्थित करण्यात येत असताना, आता यावर विरोधकांनी देखील टीका केली आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (Maharashtra State Security Corporation) कंत्राटी पद्धतीनं (Contract Method) जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. (the order to appoint three thousand contract police recruits was issued for whose benefit and to warm whose pockets supriya sule question)
…तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार ‘बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का?? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश… pic.twitter.com/zMEhU2JW3r
— Supriya Sule (@supriya_sule) October 12, 2023
कुणाचा खिसा गरम करण्यासाठी…
दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना, खासदार सुप्रिया सुळेंनी या कंत्राटी भरतीवर टिका केली. तसेच ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “…तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार ‘बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का?? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही? मुंबई सारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपण आहे? पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करणारे तरूण-तरुणी या शासनाला दिसत नाहीत का?त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय? गृहमंत्र्यांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे.”, असं ट्विटच्या माध्यमातून सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
कोणत्या कारणासाठी भरती…
मुंबईत विविध जाती धर्माचे सण, उत्सव असले की, पोलिसांवर ताण येतो. तसेच गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, रमजान आदी सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही पोलीस भरती करण्यात येत आहे. यासाठी 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही कंत्राटी पोलीस भरती करण्यात येणार आहे. तसेच मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. तर राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.