The People Of Karad Will Vote For Bjp Or Congress Nras
Satara Politics: कराड दक्षिण, उत्तरेत जोरदार चुरशीची लढत; भाजप की काँग्रेस कराडकर कुणाच्या पारड्यात मत टाकणार?
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यात थेट लढत होत आहे.
कराड: कराड दक्षिण हा काँग्रेसचा, तर कराड उत्तर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. परंतु, गेल्या दहा वर्षांत भाजपनेही या दोन्ही मतदारसंघात आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. त्यामुळे दोन्हीकडील काँग्रेस, राष्ट्रवादीचा पारंपारिक व यशवंत विचारांची जोपासना करणारा मतदार आणि भाजपकडे ओढला गेलेला युवा व हिंदुत्ववादी मतदार यांमुळे या निवडणुकीत कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चांगलीच टशन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी. येथील राजकारणावर आजही यशवंत विचारांचा पगडा असल्याचे दिसून येते. त्यामुळे याठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून प्रचारातही यशवंत विचारांची जोपासना करण्याचे आवाहन मतदारांना केले जात आहे. परंतु, कराड दक्षिण व उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ असलेल्या या तालुक्यात भाजपचीही ताकद चांगलीच वाढली असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचितीही आली. कधी नव्हे, ते दक्षिणेतून महायुतीला लीड मिळाले. तर उत्तरेतील महाविकास आघाडीला मिळालेले अल्प लीड हे भाजपने भरून काढलेल्या मतांच्या बॅकलॉग पुढे नीरस ठरले. त्यामुळे या निवडणुकीत कराड दक्षिण आणि उत्तरेत दोन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांची यशवंत विचारांवर भिस्त असल्याचे, तर दोन्हीकडे वाढलेल्या ताकदीच्या जोरावर विरोधकांच्या परिवर्तनाच्या वाऱ्यानेही चांगला जोम धरल्याचे दिसून येत आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यात थेट लढत होत आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेली विकासकामे, त्यांची स्वच्छ प्रतिमा, ज्येष्ठ मतदारांवर असलेली छाप, शहरी व सुज्ञ मतदारांवर असलेल्या प्रभाव व दोन गटात समन्वय साधण्याची हातोटी आणि येथील काँग्रेसचा पारंपारिक मतदार या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा व जयवंत शुगर साखर कारखाना, कृष्णा बँक, जयवंतराव भोसले पतसंस्था, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा वैद्यकीय विश्व विद्यापीठ व अन्य शिक्षण संस्थांच्या माध्यमातून युवकांना दिलेल्या रोजगार, कोणतेही पद नसताना भाजपच्या माध्यमातून आणलेला मोठा निधी, युवकांमधील वाढती क्रेझ, कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाच्या शिरवळ येथे होणाऱ्या दुसऱ्या शाखेत युवकांना रोजगाराचे दिलेल्या आश्वासन, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि हिंदुत्ववादी वोट बँक या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष) अधिकृत उमेदवार आ. बाळासाहेब पाटील आणि महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांच्यात थेट लढत होत आहे. याठिकाणी आ. बाळासाहेब पाटील यांचा सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, आदरणीय पी. डी. पाटील बँक, विविध पाणीपुरवठा योजना आणि यशवंत विचार व पी. डी. पाटील यांना मानणारा पारंपरिक मतदार या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर मनोज घोरपडे यांचा खटाव – माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग प्रा. लि. साखर कारखाना, चार जिल्हा परिषद घटत असलेले वर्चस्व, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मतांची विभागणी टाळण्यासाठी कमळाच्या चिन्हावर एकास एक उमेदवार दिल्याचा फायदा, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्या गटांची ताकद, तसेच युवा व हिंदुत्ववादी वोट बँक या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
परंतु, या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातील सुज्ञ, सुशिक्षित मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपल्या मतांचा कौल टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.