कल्याण : लोकल पकडताना प्रवासांचे मोबाईल हिसकावून चोरटा पसार व्हायचा. एका घटनेच्या सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आरोपी कोण आहे. हे निष्पन्न झाले. मात्र पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा माहिती पडले की हा चोरटा आधारवाडी कारागृहात आहे. सलमान अन्सारी असे या चोरट्याचे नाव असून त्याने आत्तापर्यंत आठ प्रवाशांचे महागडे मोबाईल लंपास केले होते. कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी त्यांच्याकडून आठही महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.
काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या काही रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विशेष करुन प्रवासी जेव्हा लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असतात. त्याचवेळी चोरटा त्यांचे मोबाईल हिसकावून पसार होत होता. १९ जानेवारी २०२४ रोजी असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला होता. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हेाता. रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरु केला.
पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, उपायुक्त मनोज पाटील, कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरशद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात एक चोरटा दिसून आला. दिसून आलेला चोरटा हा सराईत गुन्हेगार होता. त्याचे नाव सलमान अन्सारी असे आहे. तो भिवंडी येथे राहणारा आहे. पोलिसांनी सलमानचा शोध सुरु केला. पोलिसांना अशी माहिती मिळाली की, सलमान हा चोरीच्या प्रकरणात आधारवाडी कारागृहात आहे. पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. त्याची पोलीस कस्टडीत चौकशी करण्यात आली. त्याने या आधी आठ प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबूली दिली. त्याने महागडे मोबाईल चोरले होते. हे सगळे प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडले होते. आत्ता या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्शद शेख यांच्यासह पोलीस उप निरिक्षक प्रकाश चौगूले, पोलीस कर्मचारी राजेंद्र दीवटे, जर्नादन पुलेकर, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता बसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डीले, रविंद्र ठाकूर, हितेश नाईक, अजित माने, सोनाली पाटील, गाेरख सुरवसे, अक्षय चव्हाण आणि सुनिल मागाडे यांनी हा तपास केला.