संग्रहित फोटो
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे, त्याचवेळी पक्षातील इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलेल्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा भाजपचे कार्यकर्ते बाळगुन आहेत. परंतु इतर पक्षातून पक्षात प्रवेश दिले जात असल्याने इच्छुकांवर टांगती तलवार राहणार आहे.
पुण्यात भाजपने एकहाती सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. १२५ नगरसेवक निवडुन आणण्याचे ‘टार्गेट’ ठेवले आहे. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार चाळीस नगरसेवकांची जागा धाेक्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे. यासाठी वेळप्रसंगी दुसऱ्या पक्षातील माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्यात येत आहे. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला हाेता. त्यानंतर इतर पक्षातील नगरसेवकांना प्रवेश दिला जात आहे, तसेच काही नगरसेवक हे ‘वेटींग’वर आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्ट्राँग उमेदवारांना प्रवेश देण्याची तयारी सुरू केली असून, पुढील काही दिवसांत पंधरा उमेदवारांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, अनेकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
विधान परीषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनीही संभाव्य प्रवेशाबाबत सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी प्रवेशासाठी इच्छुक नेत्याला थेट आव्हान देत म्हटले आहे की, “हिम्मत असेल तर मैदानात समोर या, पराभवाची भीती वाटते का?” या विधानामुळे भाजपमध्ये सुरु असलेली धुसपुस पुढे येऊ लागली आहे. शिस्तप्रिय पक्ष असल्याने जाहीरपणे भुमिका मांडण्यास इच्छुक उमेदवार तयार नाहीत. इतर पक्षातील स्ट्राॅंग कार्यकर्त्याला प्रवेश दिला तर आपल्या उमेदवारीची संधी जाईल. ज्यांच्या विराेधात पक्षाचे काम केले, त्यांच्या प्रचारासाठी बाहेर पडायचे का ? असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाने आम्हाला न्याय द्यायला हवा, पक्ष दखल घेईल असा विश्वास काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
पुढील काळात जशी निवडणुक जवळ येईल, तशी राजकीय समीकरणे बदलू लागतील. पक्षाने ‘इनकमिंग’ करणाऱ्याला संधी दिली तर भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता काय करणार ? पक्षाचे स्थानिक नेते त्यांची कशी समजुत काढणार ? याची उत्तरे पुढील काळातच मिळतील.