संग्रहित फोटो
तासगाव : अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑक्टोबर रोजी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर जुने बसस्थानक परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने ‘चक्काजाम आंदोलन’ केले होते. शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा उद्रेक या आंदोलनातून झाला. तथापि, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे कारण देत पोलिसांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, प्रभाकर पाटील यांच्यासह एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यादीत किशोर पाटील (रा. रांजणी), जनार्दन पाटील (रा. बोरगाव), मोहन खोत (रा. विठुरायचीवाडी), खंडू होवाळे, विशाल उर्फ लाला वाघमारे (रा. कवठेमहांकाळ), अजय पाटील (रा. कवठेमहांकाळ), महादेव सूर्यवंशी (रा. कवठेमहांकाळ), रणजित घाडगे (रा. कवठेमहांकाळ), अजित माने (रा. कवठेमहांकाळ) आणि पिंटू माने (रा. कवठेमहांकाळ) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे करत आहेत.
दरम्यान, तसाच गुन्हा तासगाव पोलिस ठाण्यात देखील दाखल करण्यात आला असून, माजी खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील यांच्यासह ११ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये प्रमोद शेंडगे (माजी समाजकल्याण सभापती, पेड), आर. डी. आप्पा उर्फ रवींद्र पाटील (निमणी), माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर, सुदीप खराडे, माजी नगरसेवक माणिकराव जाधव, हेमंत उर्फ हणमंत पाटील (तासगाव), महेश पाटील (कुमठे) आणि कृष्णा पाटील (लिंब) यांचा समावेश आहे.
या आंदोलनादरम्यान शेकडो शेतकऱ्यांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात घोषणाबाजी करत “आमच्या पिकांचे पंचनामे झाले, पण मदत कुठे?” असा सवाल केला होता. पावसाने द्राक्ष, उडीद, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा होती. मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने या चक्काजाम आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागल्याचे संजय पाटील यांनी सांगितले होते. आता दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण २४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे.