पुणे, मुंबईसह सातारा, नाशिक, कोल्हापूर गारठले; तापमानात होतीये सातत्याने घट (फोटो सौजन्य - iStock)
मुंबई : राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच गुलाबी थंडीचा जोर वाढला असून, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटे धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात शिरल्याने किमान तापमानात अचानक घसरण झाली आहे. पुणे, नाशिक, मुंबईपासून ते कोल्हापूर-साताऱ्यापर्यंत गारठा जाणवू लागला आहे.
सोलापूर, सांगली, साताऱ्याचा पारा शुक्रवारी 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. तर जळगाव आणि जेऊरमध्ये एक आकडी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. अनेक ठिकाणी किमान तापमानात २ ते ८ अंश सेल्सिअसची लक्षणीय घट झाली असून, हवामान खात्याने पुढील काही दिवस कमी तापमान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वातावरणात बदल होत असतानाच हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज वर्तविला आहे.
हेदेखील वाचा : थंडीची सुरुवात ! हिमाचल प्रदेशातील ताबोत तापमान पोहोचले उणे 2 अंशांपर्यंत; राजस्थानमध्येही तापमान घसरले
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 दिवसांत किमान तापमानात मोठा बदल होणार नसला तरी उत्तर महाराष्ट्रात तापमान आणखी २ ते ३ अंशांनी खाली येऊ शकते. अनेक ठिकाणी किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
मुंबई, मराठवाडा, विदर्भातही थंडीची चाहूल
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या परिसरात पहाटेच्या वेळी थंडी स्पष्ट जाणवत आहे. उपनगरात सकाळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना हुडहुडी जाणवत असून तापमानात हलकी घट नोंदली जाते. मुंबई शहरात शुक्रवारी २२.६ तर उपनगरात १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुणे, नाशिक, जळगाव, बीड, नांदेड, परभणी या शहरांमध्ये उत्तरेकडील वाऱ्यांचा थेट परिणाम जाणवत असून, गारठा वाढला आहे.
वृद्धांसह लहान मुलांचीही घ्या काळजी
सकाळ-संध्याकाळ गारठा, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा थंडी अशी परिस्थिती असल्याने लहान मुले, वृद्ध, आणि श्वसनाचे त्रास असलेल्या नागरिकांनी खास काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. आणखी काही दिवस थंडीची लाट कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात थंडी सुरु
ऑक्टोबर हिट’नंतर आता नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल सुरु झाली आहे. यात अनेक ठिकाणी शेकोट्या तर काही ठिकाणी याच थंडीपासून वाचण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग सहा महिने कोसळल्यानंतर पाऊस आता सर्वदूर थांबला आहे. पाऊस जाऊन आता गुलाबी थंडीही सुरु झाली आहे.






