सौजन्य - नवराष्ट्र टीम
वाहतूक अधिकारी सोलवनकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी अचानक २५ गाड्या फलटणला गेल्यामुळे हा गोंधळ उडाला आहे. प्रवाशांना त्रास होतोय याची आम्हाला कल्पना आहे. दिवसभरात आमच्या सुमारे २० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ज्यांना आरक्षण रद्द करायचे आहे, त्यांचे पैसे आम्ही परत देत आहोत.
काही महिन्यांपूर्वी अकलूज बस स्थानकाला बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळेपर्यंत बस स्थानकाची सतत स्वछता ठेवली जात होती. बसस्थानक सुंदर दिसावे, यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांनी मदतही केली होती. पुरस्कार मिळाल्यानंतर बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. स्थानक परिसरात निर्माण केलेल्या बागेची कचराकुंडी झालीय. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे सगळे फलाट लाल झाले आहेत. पाणी पिण्याच्या टाकीचे नळ गायब झाले आहेत.
शासनाने पुरस्कार काढून घ्यावा
बस स्थानकाचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे स्थानकाची एकच बाजू सध्या वापरात आहे. स्थानकाकडे कोणाचेच लक्ष नाही. सायंकाळी सातनंतर बस स्थानक ओस पडलेले असते. रात्री मद्यपींचा वावर असताे. पुरस्कारापुरते बस स्थानक स्वच्छ ठेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या या अकलूज बस स्थानकाचा पुरस्कार शासनाने काढून घ्यावा, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.
खासगी वाहनधारकांकडून लूट
अकलूज बस स्थानकाकडून पुणे, मुंबई रूटचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे अकलूज शहरातून सुमारे ४० खासगी गाड्या पुण्याला प्रवासी वाहतूक करतात. ३५० रुपये प्रति प्रवासी दर आकारला जात होता. सध्या दिवाळी सणाच्या काळात ५०० रुपये प्रति प्रवासी दर आकारला जात आहे. बस स्थानकात येऊन खासगी वाहनधारक प्रवासी घेऊन जात आहेत.






