संग्रहित फोटो
पुणे : अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) आणि इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
पूर्वी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही काही विद्यार्थी प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालक आणि विद्याथ्यांनी केली होती. त्यामुळे जानेवारीमध्ये पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, त्यानंतरही काही विद्यार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
परिपत्रकानुसार २ मे, २०२५ पासून पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हा निर्णय केवळ प्रवेश निश्चित झालेल्या, पण अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या ‘एसईबीसी’ आणि ‘ओबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच लागू असणार आहे. प्रमाणपत्र अद्याप सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीचा लाभ घेऊन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.