 
        
        24 हजार रुग्णांवर होणार उपचार (फोटो- टीम नवराष्ट्र)
सोलापूर: जिल्ह्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एक एप्रिल 2025 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 24 हजार 169 रुग्णांच्या 23 हजार 763 शस्त्रक्रिया/उपचार यावर रुग्णालयांना 55 कोटी 21 लाख 69 हजार 990 रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत शासकीय व खाजगी अशी एकूण 114 रुग्णालये अंगीकृत असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा बैठकीत डॉ. शेटे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे, डॉ. मोहन शेगर, यांच्यासह आयुष्यमान भारत योजनेच्या मान्यताप्राप्त सर्व खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात भरती! पगार ऐकून व्हाल चकित; आताच करा अर्ज
यावेळी डॉ. शेटे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत चांगले कामकाज होत आहे. विशेषता ग्रामीण भागात चांगले काम झालेले असून शहरी भागात अधिक चांगले काम करण्याची गरज असून यासाठी सोलापूर महापालिका, सर्व नगरपालिका नगरपंचायती यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येऊन आयुष्यमान कार्ड काढण्याची प्रक्रिया जलद करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेचे 40 लाख 91 हजार 996 लाभार्थी असून 13 लाख 92 हजार 965 लाभार्थ्यांचे कार्ड जनरेट झालेले आहेत.
उर्वरित कार्ड लवकरच काढले जातील, असे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात जास्तीत जास्त आरोग्य मित्र उपलब्ध असले पाहिजेत व या सर्व आरोग्य मित्रांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना या योजनेची सविस्तर माहिती दिली पाहिजे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थ्यास प्रती कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य संरक्षण दिले जाते. जिल्ह्यातील सर्व प्रकारचे रेशन कार्डधारक हे या योजनेचे लाभार्थी आहेत ज्या व्यक्तीकडे रेशन कार्ड नसेल व दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्यांमध्ये वास्तव्य असेल ती व्यक्ती रहिवासी प्रमाणपत्राद्वारे देखील योजनेचा लाभ घेऊ शकते.
या योजनेअंतर्गत एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 28 हजार 66 लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला असून त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयांना 84 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. तसेच जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 140 रुग्णालय अंगीकृत करण्याचे उद्दिष्ट असून आज रोजी पर्यंत 114 रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध केली जात आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहनही डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले. या योजनेअंतर्गत रुग्णांना उत्कृष्ट पद्धतीचे उपचार मिळाले पाहिजेत तसेच रुग्णालयांचेही नुकसान होणार नाही या दृष्टीने दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 40 लाख 91 हजार 9996 लाभार्थ्यांपैकी 13, लाख 92 हजार 965 लाभार्थ्यांनी इ कार्ड काढण्यात आल्याची माहिती दिली. तसेच सर्व रेशन कार्डधारकांचे आधार सीडिंग झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर वाघमारे यांनी 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वितरण मोहिमेअंतर्गत नव्याने 1012 अशा वर्कर ऑपरेटर लॉगिन आरोग्यमित्र च्या साह्याने भरवण्यात आल्याचे सांगून सद्यस्थितीत 2557 अशा वर्कर ऑपरेटर आयडी ऍक्टिव्ह झाल्याची माहिती दिली. तसेच या योजनेअंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. यावेळी या योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या खाजगी रुग्णालयाच्या प्रतिनिधी यांनीही सूचना मांडल्या.






