श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन; तयारीही झाली सुरु (File Photo : Vitthal Rukmini Mata)
पंढरपूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे सोमवारी मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवी निगडे, ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, ह. भ. प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले तसेच टीसीएस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर भीमा सेखर व विविध खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत मंदिर जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सध्या गाभारा, बाजीराव पडसाळी, सभामंडप व इतर अनुषंगिक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार असून, दगडी कामास कोटींग करणे व वॉटरप्रुफिंगची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यांची आषाढी यात्रेपूर्वी चाचणी घेण्यासाठी व मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या संगणक प्रणाली सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीची विनंती टीसीएस कंपनीने मान्य केली आहे. त्यामध्ये ऑनलाईन डोनेशन, भक्तनिवास बुकींग, पुजा बुकींग, लाईव्ह दर्शन व इतर अनुषंगिक बाबींसाठी संगणक प्रणालीचा समावेश आहे. इत्यादीबाबत निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगितले.
प्रतिवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी 4 एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधीत 2 ते 12 एप्रिल असा आहे. या यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये या यात्रेला येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.