कर्जत/संतोष पेरणे: माथेरान हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. थंड हवेचं ठिकाण आणि निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणात असल्याने पर्य़टकांना माथेरान कायमच खुणावतं. मात्र हेच निसर्ग सौंदर्य आता मृत्यूचा सापळा होत असल्याचं दिसून येत आहे. फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या आनंदाला गालबोट लागल्याची घटना माथेरानमधून येत आहे. तेलंगणा राज्यातून पर्यटनासाठी आलेल्या टुरिस्ट गाडीला माथेरान घाटात अपघात झाला.सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात गाडीमध्ये असलेले सहा पैकी पाच प्रवासी जखमी असून त्यांना रायगड हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेलंगणा राज्यातील पर्यटक टी एस 07 एच बी 1350 ही एर्टिका गाडी घेऊन महाराष्ट्र राज्यातील माथेरान येथे पर्यटनासाठी आले होते.
आज सकाळी त्यांचे वाहन नेरळ माथेरान घाटरस्ता पार करीत असताना पिटकर पॉइंट येथे त्यांच्या गाडीचा चालक याला तेथे अवघड वळण पार करता आले नाही आणि ती गाडी तेथे पलटली.त्याची माहिती मिळताच नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे,पोलिस उप निरीक्षक श्रीरंग किसवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुग्णांसाठी रुग्णवाहिका बोलावून घेत जखमींना रुग्णालयात पाठवून दिले.या अपघातात गाडी मधून प्रवास करणाऱ्या पाच पैकी एक महिला प्रवासी गंभीर असून अन्य चार प्रवासी यांना फ्रॅक्चर झाले आहे.
अपघात घडल्यानंतर या सर्व जखमी प्रवासी यांना रुग्णवाहिकेतून कल्याण नेरळ कर्जत रस्त्यावर असलेल्या रायगड हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.तेथे सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यातील एक महिला रुग्णाच्या डोक्याला मार लागला आहे तर अन्य चार प्रवासी यांना फक्चर असल्याची माहिती रायगड हॉस्पिटलचे सूत्रांनी दिली आहे. जखमींमध्ये तेजस्विनी इंदोलकर,त्रिलोक राव,यादनिकी राव,पूजा रेवा आणि साकेत कासू यांचा समावेश आहे.जखमींचे वय साधारण 25 ते 35 वयोगटातील असून सर्व तरुण आहेत.