शाळा म्हटलं की स्कूल व्हॅन ही अत्यावश्यक झाली आहे. आपली मुलं सुरक्षित शाळेत जावी म्हणून पालक मुलांना स्कूल व्हॅनने पाठवतात. मात्र आता याच स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या मुलांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा स्कूल व्हॅन चालकाचा हलदगर्जीपणा आता समोर आला आहे. अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली होती.
या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला होता. याप्रकरणी खासगी इको व्हॅनचालक आणि व्हॅनमधील मदतनीस असलेल्या दोन महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी युवा सेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी गट शिक्षणाधिकारी व्ही एस पोतेकर यांना निवेदन दिले. यावेळी शहरात काही स्कुल व्हॅन मार्फत अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असून अशा वाहनचालक आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तर संबंधित शाळेकडून याबाबत अहवाल घेतला असता स्कुल व्हॅन ही शाळा प्रशासनाने पुरवेलेली नसुन पालकांनी स्वतः व्हॅनची व्यवस्था केली होती.
संबंधित चालकाने याची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्यती कारवाई करण्यात येईल, असे गट शिक्षणाधिकारी पोतेकर यांनी सांगितले आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली नाही मात्र एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्या विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे.विद्यार्थी व्हॅनमधून बाहेर पडले त्यावेळी मागून अवजड वाहन भरधाव वेगाने आले असते तर याचा जबाबदार कोण असतं , असा पालकांनी उपस्थित केला आहे. सदर प्रकरणाचं गांभीर्य पाहता स्कूल व्हॅनचा चालक सोलमन सकप्पा, स्कूल व्हॅनची लेडी अटेंडंट उषा बळीद आणि कविता जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता शाळा प्रशासन विद्य़ार्थ्यांच्या सुरतक्षेच्य़ा दृष्टीकोनातून काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.