उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील सोलापूर-पुणे महामार्गावर रिक्षातून गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी निघालेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू व रिक्षा असा ३ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कारवाई सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गोल्डन लॉज समोर बुधवार (दि.२९) मे रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारांस करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल संजय खांडेकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मिथुन बाबु राठोड, (वय ४०, रा. सर्वे नं १४, नाईकनगर गणेश वखार शेजारी येरवडा पुणे शहर), व रोहित राजु कापसे (वय २५, रा. सर्वे नं ८, यशवंतनगर, हनुमान मंदिरजवळ, येरवडा, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर -पुणे महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गोल्डन लॉज समोर बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल खांडेकर व त्यांचे पथक गस्त घालीत होते. यावेळी सोलापूर पुणे महामार्गावरून लॉजच्या समोर एक संशयित रिक्षा दिसून आली. यावेळी रिक्षात दोघेजण दिसून आले. संशय आलेने थांबवून रिक्षाची पाहणी केली असता रिक्षात बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टीची २८ हजार रुपये किमतीची ३५ लिटर मापाचे ८ प्लास्टीकची कॅन व त्यामध्ये २८० लिटर तयार दारू आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी तयार दारू व ३ लाख रुपयांची रिक्षा असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस हवालदार अमोल खांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार होळकर करीत आहेत.