वसई : ६० लाख रुपये किमतीचे सांबर आणि वन्य प्राण्याचे शिंग विक्री करण्यासाठी आलेल्या २ आरोपींना अटक करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. एफल इंन्डस्ट्री, पेल्हार, नालासोपारा येथे दोन इसम काळवीटाच्या शिंगाची विक्री करण्यासाठी असल्याची बातमी पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक तुकाराम भोपले आणि पथकासह सापळा रचून मोहम्मद इम्रान फरियादअली शाह आणि अशोक विरजीभाई पटेल यांना अटक केली.
त्यावेळी त्यांच्या रिक्षात काळविट या वन्य प्राण्याचे ५० लाख रुपये किंमतीचे एक जिन सापडले. त्यांच्या ताब्यातून एक रिक्षा आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ५१ लाख, २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सापडलेले शिंग हे नक्की कोणत्या प्राण्याचे आहे, याची संजय गांधी उद्यानातील वैद्यकीय अधिकारी, पशु चिकीत्सक यांच्याकडून खात्री केली असता, सदरचे शिंग हे सांबर या वन्य प्राण्याचे असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १, ३९, ४४, ४८ सह भारतीय वन अधिनियम २६(१)(ड), २६ (१)(आय) ६५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अधिक तपास केल्यावर या आरोपींकडे १० लाख रुपये किमतीचे आणखी एक शिंग सापडले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड, सपोनि सोपान पाटील, उपनिरिक्षक तुकाराम भोपले, हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, संजय भामाळ, रवि वानखेडे, किरण आवाड, निखील मंडलिक, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी ही कामगिरी केली.