सौजन्य - सोशल मिडीया
कोल्हापूर : भात पिकाची रोप लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील (वय ३६) व त्याचा सख्खा लहान भाऊ स्वप्नील (३१, दोघे रा. कोपार्डे, ता. शाहूवाडी) यांचा वीजेच्या तारेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि, ३) दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुहास व स्वप्नील दोघेही विवाहित आहेत.
सुहास व स्वप्नील शेतीत काम करत होते. शेतीला जोडधंदा म्हणून दोघे गावाशेजारील येळाणे हद्दीतील चनवाड फाटा येथे गाड्या धुण्यासाठीचे सर्व्हिंसिंग सेंटरही चालवत होते. दोघेही बुधवारी (दि, ३) दुपारी दोनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर भात लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यासाठी वडिलांबरोबर गेले. दोघे तणनाशक व खत घालत होते. त्यावेळी वडिलांनी जनावरांना वैरण काढली. त्यानंतर ते भारा घेऊन घरी आले.
पाठीमागे दोघे भाऊ भात शेतात काम करत होते. त्यावेळी नदीकडील बाजूस शेतपंपासाठी असणाऱ्या वीज खांबाच्या आधारासाठी लावलेल्या तारेमधून वाहत असलेल्या वीज प्रवाहाचा धक्का मोठा भाऊ सुहास याला बसला. या धक्क्याने सुहास धडपडत खाली कोसळला. भाऊ कोसळल्याचे पाहून स्वप्नीलने त्याला पकडले. त्यामुळे त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरी दोन्ही मुले घरी का आली नाहीत, म्हणून त्यांना बोलावण्यासाठी वडील कृष्णा पुन्हा शेतात गेले. त्यावेळी वीज खांबाशेजारी दोन्ही मुलगे निपचित पडल्याचे दिसले. वीज तारेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधून ते माघारी फिरले. आरडाओरडा करतच ते गावात आले आणि गावकऱ्यांना झालेला प्रकार सांगितला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट
ग्रामस्थांनी घटनेची माहिती महावितरणला देत घटनास्थळाकडे धाव घेतली. सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुहास व स्वप्नील दोघेही विवाहित आहेत. सुहास याला एक मुलगी आहे. घटनास्थळी महावितरणचे अधिकारी व पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.