कालव्यात अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू (File Photo : drowning)
सालेकसा : गावाजवळून प्रवाहित असलेल्या कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.2) तालुक्यातील गोरे येथे दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. प्रशांत नरेश पटले (वय 18) आणि प्रतीक बिसेन (वय 18) असे मृत तरुणांची नावे आहेत.
सध्या दिवसा उन्ह आणि सायंकाळी वादळ-वारा आणि पाऊस असे वातावरण आहे. त्यामुळे दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे गार थंड पाण्यात अंघोळ करण्याचा मोह कुणीही आवरू शकत नाही. सालेकसा तालुक्यातील पुजारीतोला प्रकल्प तयार करताना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकार अशा दोन्ही राज्याच्या निधीतून हा प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामुळे दोन्ही राज्यांतील शेतीला सिंचनासाठी स्वतंत्र कालवे तयार करण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर; जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू
मध्यप्रदेश कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे. त्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी गोरे गावातील तीन मुले गेली. त्यात प्रशांत पटले, प्रतीक बिसेन, सुमित रवींद्र बिसेन (17) हे तिघेही शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास गेले होते. त्यांना पोहता येत नव्हते. प्रशांत आणि प्रतीक यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोलात गेल्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.
सुमितने झाडाला ठेवले पकडून
सुमित देखील वाहून जात असताना कालव्यात असलेल्या झाडाला पकडून ठेवल्याने तो बचावला. सुमितने बाहेर निघून गावच्या लोकांना दिली. त्यामुळे सालेकसा पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास दोघांचेही मृतदेह सापडले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, फार्महाऊसवर मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या युवकाचा जलतरण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला होता. प्रांजल रावळे (वय 22, रा. चंद्रमणीनगर) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.