छत्रपती संभाजीनगरमधील पाण्याच्या श्रेयावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरु (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये लवकरच निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून जागावाटपाची बोलणी देखील सुरु झाली आहे. नेत्यांचे दिल्लीवारी आणि राज्याचे दौरे देखील वाढले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीने देखील तयारी सुरु केली असून लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरु आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूकीपूर्णी मोठी घोषणा केली आहे. लोकसभेमध्ये हारल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला असून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मागील महिन्यामध्ये राज्यामध्ये लोकसभेच्या निकालाने मोठा धक्का बसला. महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरस ठरली. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला. यानंतर त्यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभेनंतर आता ते राज्यातील राजकारणाकडे वळाले आहेत. याचवेळी त्यांनी आपला मतदारसंघ देखील जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आदेश दिल्यास संभाजीनगर पश्चिममधून मी निवडणूक लढवणार, मला गद्दारांना पाडायचं आहे. असा निर्धारही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
माध्यमांशी संवादा साधताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याकडून जर आदेश आल्यास संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी मी लढेल, बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी देण्याचं लोकांना पटत नाही. राजू शिंदे यांना अंबादास दानवे यांनी प्रवेश मला विचारून दिला नाही. मला पाडण्यासाठी राजू शिंदे यांनी मदत केली, त्यामुळे अशा लोकांना कोण मदत करणार. परिणामी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. मला गद्दारांना धडा शिकवायचा आहे, म्हणून मी विधानसभा लढणार,” अशी मोठी घोषणा चंद्रकांत खैरे यांनी स्वतः केली आहे.
पुढे ते म्हणाले, “या मतदारसंघात पहिला हिंदू आमदार मी झालो होतो. सध्या यांचा पैशांचा उन्माद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मला पैशाने पाडण्यात आले. आता शरद पवार आणि काँग्रेसचा वलय आहे. त्यामुळे 140 जागा आम्ही लढवणार असल्याची तयारी आहे. तर आमची 103 जिंकणार असल्याची तयारी असल्याचे,” देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.