सौजन्य - सोशल मिडीया
सिंधुदुर्ग : कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा इतक्या निकृष्ट दर्जाचा कसा उभारला जाऊ शकतो, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. यावरुन आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पुतळा का पडला? याची 2 प्रमुख कारणे सांगितली आहेत.
उदयनराजे नेमकं काय म्हणाले?
राजकोट मधील पुतळा दुर्घटना ही निश्चितच दुर्देवी आणि अचानक घडलेली घटना आहे. देशातील सर्व जाती धर्मातील नागरीकांमध्ये या घटनेचे दुःख आहे. पुतळा उभारणीतील कच्चा दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या अभागी घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु नये, विशेष कोणाला लक्ष बनविणे टाळले पाहीजे. असे आवाहन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झालेच पाहीजे आणि समुद्रतटीय निसर्गनियमांचा आणि वातवरणीय बदलांचा पुरेपुर अभ्यास करुन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांना प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा, असे मत आज उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
समाजाने संयम बाळगावा
राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायीच आणि निषेधार्य आहे. या घटनेचे भांडवल करणाऱ्यांकडून, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील तर शिवविचारांचा पाईक असलेल्यांना ते मान्य होणार नाही. म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी संयम बाळगला पाहीजे. असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे.