कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती हे कोल्हापूरचे महाराज आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे खळबळजनक विधान केले आहे. मंडलिकांच्या या वक्तव्याचा सातारा गादीचे वारसदार, खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे.
मंडलिकांना काही कळतं का?
चंदगड तालुक्यातील नेसरी येथील सभेत खासदार मंडलिकांनी शाहू छत्रपती यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असा निशाणा मंडलिकांनी शाहू छत्रपती यांच्यावर साधला. यावर उदयनराजेंनी मंडलिकांना काही कळतं का? त्यांना इतिहास काही माहिती आहे का, अशा शब्दात समाचार घेतला आहे.
महाराजांचे लीड एक लाखाच्यापुढे जाणार
माजी मंत्री सतेज पाटलांनी मंडलिकांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. ते म्हणाले, कोल्हापूरकर कधीही सहन करणार नाहीत, असे मंडलिकांनी विधान केले आहे. महाराजांचा विजय निश्चित असून, त्यांचे लीड एक लाखाच्या पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातूनच मंडलिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी असे विधान केले. त्यांनी शाहू छत्रपतींची माफी मागावी.