पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडवर, काय आहे ठाकरेंचा प्लॅन? (फोटो सौजन्य-X)
Uddhav Thackeray News Marathi: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेकजणांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. पुण्यातील ६ माजी नगरसेवक आणि माजी आमदार जेष्ठ शिवसेना नेते राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे वाढत चाललेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आता सावध भूमिकेत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसैनिकांना आणि अधिकाऱ्यांना आव्हान देण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. या मोहिमेतुन राजन साळवी आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी धनुष्यबाण हाती घेतील, असे वारंवार शिंदे गटातील नेतेमंडळी सांगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा कृती कार्यक्रम आखला आहे.
त्यानुसार आता दर मंगळवारी शिवसेना आणि ठाकरे गटाची बैठक होणार आहे.दर मंगळवारी पक्षाचे १४ प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. लवकरच आमदार आणि खासदारांची देखील स्वतंत्रपणे बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज मंगळवारी शिवसेना भवनातील प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षातील गळती रोखण्यासंबंधीच्या उपाययोजना आणि त्यासाठी प्रमुख नेत्यांच्या भेटी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडली.
उपरोक्त बैठकीत संघटनेतील कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात येईल. तसेच शिवसेनेचे प्रमुख नेते संघटनेसंबंधी विषयांवर जातीने लक्षन घालून अडचणींवर मार्ग शोधतील, असे कळते. संघटना बांधणी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आता दर मंगळवारी बैठक होणार आहे.
मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काहीजण पक्षविरोधी काम करत असल्याच निदर्शनास येत आहे. याचपार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता, उपनेते, सचिव त्यांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे आणि इतर 14 जणांवर नेते पदाची, 43 जणांवर उपनेते पदाची आणि दहा जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे.